अपुऱ्या पावसाने खरीप धोक्यात; दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आक्रमक
पंचनामे, पीक विम्याची अग्रीम मदत व नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा स्थायी समितीचा ठराव; ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचीही मागणी
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.३ सप्टेंबर
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, पीक विम्याची अग्रीम मदत व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली. खरीप हंगामातील पिकांना अपुऱ्या पावसाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याबरोबरच पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रीम मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ३० वर्षांहून जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत ठराव मांडण्यात आला. जुन्या शासकीय इमारतींची बांधकाम स्थिती तपासून आवश्यक त्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीची कार्यवाही करण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे.
बैठकीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मागील स्थायी समिती सभेच्या कार्यवृत्तास मान्यता देण्यात आली. शासन निर्णय व विविध परिपत्रकांचे अवलोकन करण्याबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्चाचाही आढावा घेण्यात आला.
तसेच जिल्हा ग्रामविकास निधीचा वापर, विविध विषय समित्यांच्या कार्यवृत्तांची नोंद आणि संबंधित विभागांच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देताना उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते.