समुपदेशनापुरतीच सामान्य प्रशासन विभागाची भूमिका
पदस्थापनेचा निर्णय संबंधित विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा; उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची माहिती
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.७ ऑक्टोबर
जिल्हा परिषदेमधील कर्मचारी समुपदेशन व पदस्थापना प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नसून, विभागाकडून केवळ समुपदेशनाची प्रक्रिया आयोजित केली जाते, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली.

जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया नियमानुसार राबविली जाते. या प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून नियोजन, वेळापत्रक निश्चित करणे तसेच समुपदेशनाचे आयोजन केले जाते. मात्र, समुपदेशनानंतर कर्मचाऱ्यांची पदस्थापना कुठे करायची, याबाबतचा निर्णय संबंधित विभागप्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर घेतला जातो.
यामुळे समुपदेशन प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागाची भूमिका ही प्रामुख्याने प्रक्रिया आयोजित व समन्वय करण्यापुरती मर्यादित आहे. पदस्थापनेचा अंतिम निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेतला जात नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी पदस्थापना आणि समुपदेशन प्रक्रियेवरून विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे संबंधित निर्णय कोणत्या स्तरावर घेतला जातो, याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे व नियमानुसार पार पाडणे, ही सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी असली तरी प्रत्यक्ष पदस्थापनेचा निर्णय हा संबंधित विभागाची आवश्यकता, उपलब्ध पदे आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घेतला जातो. त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेतील आयोजनाची जबाबदारी आणि अंतिम पदस्थापना निर्णय यामध्ये स्पष्ट फरक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.