योगातून निरोगी भारताचा संदेश; जुहू बीचवर मुख्यमंत्र्यांसह हजारोंचा सहभाग
जीवनशैलीजन्य आजारांवर योगच प्रभावी उपाय; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन…

सोलापूर व्हिजन
मुंबई, दि. २१ जून
भारताच्या प्राचीन आणि गौरवशाली योगपरंपरेचा जागतिक स्तरावर वाढता प्रभाव अधोरेखित करत जुहू बीच येथे १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमीत साटम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात सामूहिक योगाभ्यास करत नागरिकांनी योग दिन साजरा केला.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग ही भारताची अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि वैज्ञानिक चिकित्सा पद्धती असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिली आणि आज जगभरातील देश योगाचे महत्त्व स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या नॉन-कम्युनिकेबल आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत योग हा केवळ व्यायाम नसून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणारा प्रभावी उपाय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास आणि संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात निरोगी, सक्षम आणि तणावमुक्त समाज घडविण्यासाठी योग संस्कृतीचा प्रचार-प्रसार अधिक व्यापक स्वरूपात होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
योग हा केवळ भारताचा वारसा नसून संपूर्ण मानवजातीला निरोगी जीवनाचा मार्ग दाखवणारी जीवनपद्धती आहे, असा संदेश या भव्य कार्यक्रमातून देण्यात आला.