एमएसईबीतील रोजगारासाठी पारधी समाजाच्या युवकांना दिलासा

एमएसईबीतील रोजगारासाठी पारधी समाजाच्या युवकांना दिलासा

एमडी औंडीकर यांच्या निर्देशांनंतर नोकरी प्रक्रियेला गती; पाठपुराव्याला यश

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. २१ जून

आयटीआय व इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण करूनही अनेक वर्षे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी पारधी समाजातील तरुण-तरुणींना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (एमएसईबी) व्यवस्थापकीय संचालक श्री. औंडीकर यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान हा प्रश्न थेट त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यानंतर संबंधित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

सोलापूर दौऱ्यानिमित्त बालाजी सरोवर येथे पारधी समाजाच्या वतीने एमडी औंडीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील आयटीआय उत्तीर्ण तसेच एमएसईबीमध्ये इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या युवक-युवतींच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दोन ते तीन वर्षांपासून प्रशिक्षण पूर्ण असूनही नोकरीत समावेश न झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी ९ जून २०२५ रोजी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी हा विषय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मांडला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनीही एमएसईबी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता.

सदर बाबीची गांभीर्याने दखल घेत एमडी औंडीकर यांनी उपस्थित असलेल्या सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना पात्र युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रोजगाराच्या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, नगरसेविका राजश्री चव्हाण तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यामुळे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी सिद्धाराम चव्हाण, सुमित चव्हाण, आशुतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *