३.६३ कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात मोठी कारवाई; ७५४८ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
२४५ साक्षीदारांच्या जबाबांचा आधार; २३ जूनला प्राथमिक सुनावणी
सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि. २० जून
बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत तब्बल ३ कोटी ६३ लाख २० हजार रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेने तपास पूर्ण करत ७५४८ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात २४५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, प्रकरणाची प्राथमिक सुनावणी २३ जून २०२६ रोजी होणार आहे.
या प्रकरणामुळे कामगार कल्याण योजनांमधील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करून घेतल्याचा आरोप संबंधितांवर आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची पडताळणी करून पोलिसांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त एम. आर. झोले यांनी ४ मार्च २०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर नोंदणी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि एजंट अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुन्हे शाखेने विविध कागदपत्रांची तपासणी, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि शेकडो लाभार्थी व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून दोषारोपपत्र तयार केले आहे. त्यामुळे आगामी सुनावणीदरम्यान या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आरोपींकडून दाखल करण्यात आलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आरोपींच्या वतीने अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगावकर, अॅड. एच. आर. मुसळे आणि अॅड. देवदत्त बोरगावकर हे काम पाहत आहेत.
R.C.C. क्र. ८८६/२०२६ या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, २३ जूनच्या सुनावणीत पुढील न्यायालयीन प्रक्रियेची दिशा स्पष्ट होणार आहे.