यंदा ५०० पार राजेंद्र राऊतांचा विक्रमी विजय होणार; विरोधी आमदारही विकासासाठी आमच्यासोबत – जयकुमार गोरे

यंदा 500 पार राजाभाऊंच्या विजयासाठी जय भाऊंची फिल्डिंग ;  राऊतांचा विक्रमी विजय होणार; विरोधी आमदारही विकासासाठी आमच्यासोबत – जयकुमार गोरे

सोलापूर व्हिजन

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा ऐतिहासिक आणि विक्रमी विजय होईल, असा ठाम विश्वास ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भातील विभागीय कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपच्या विकासकेंद्री राजकारणाचा पुनरुच्चार केला.

राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण आले आहे. सोलापूर जिल्ह्यातही भाजपकडून ‘ऑपरेशन तुतारी’ राबवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला कोणतेही ‘ऑपरेशन तुतारी’ करण्याची गरज नाही. आम्ही ‘ऑपरेशन विकास’ राबवत आहोत. जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा विकासावर विश्वास आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांना गती मिळाली असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकासासाठी निधी, निर्णयक्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असते. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व उपलब्ध असल्याने विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधीही विकासाच्या मुद्द्यावर आमच्या भूमिकेशी सहमत आहेत,” असे गोरे म्हणाले.

विरोधी पक्षातील तीन आमदार महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचा दावा करताना त्यांनी हा पाठिंबा कोणत्याही राजकीय दबावामुळे नसून विकासकामांच्या विश्वासार्हतेमुळे मिळाल्याचे सांगितले.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीची संघटित ताकद, विकासाचा अजेंडा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाठिंबा यामुळे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार गोरे यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *