गद्दार खासदारांविरोधात शिवसैनिकांचा संताप अनावर

सोलापुरात सहा फुटीर खासदारांचे ‘तेरावे’; गणपती घाटावर अनोखे आंदोलन

सोलापूर व्हिजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवसैनिकांचा संताप शुक्रवारी अनोख्या आंदोलनातून व्यक्त झाला. शहर शिवसेनेच्या वतीने गणपती घाट येथे या खासदारांचे प्रतीकात्मक ‘तेरावे’ घालून निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी उष्टे-खरकटे अन्न ठेवून खासदारांच्या राजकीय भूमिकेचा निषेध केला. तसेच संबंधित खासदारांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रताप चव्हाण म्हणाले, “शिवसेना हा संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत. फुटीरतेला शिवसेनेत स्थान नसून कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”

महेश धाराशिवकर यांनी विशेषतः माजी खासदार ओम निंबाळकर यांच्यावर टीका करताना सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विश्वासघात झाला आहे. या राजकीय गद्दारीला शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल.”

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनातून दिसून आले. आगामी काळात अशा नेत्यांविरोधात जनजागृती मोहीम राबविण्याचा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात विष्णू कारमपुरी, सुरेश जगताप, संताजी भोळे, राजाभाऊ कुसेकर, बंटी बेळमकर, विशाल सुरेगावकर, आतिश पाटोळे, दिनेश चव्हाण, बाबू राठोड, राहुल परदेशी, अतुल भवर, उज्ज्वल दीक्षित, अजय मळगे, मोहम्मद मुलानी, शकील अत्तर, पंकज गजाकोश, समर्थ गायकवाड, विश्वजीत चौगुले, संगप्पा कोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *