महायुतीच्या एकजुटीचा शक्तीप्रदर्शन; राजेंद्र राऊतांच्या विजयासाठी सर्वपक्षीय पाठिंब्याची मोट बांधणी

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोलापुरात राजकीय सलोखा; विकासाच्या अजेंड्यावर महायुतीचा भर
सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि. ११ जून
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात झालेली महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक केवळ निवडणूक रणनीतीपुरती मर्यादित न राहता भविष्यातील जिल्हा विकासाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरल्याचे चित्र दिसून आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठकीनंतर बोलताना महायुतीची एकजूट, सर्वपक्षीय सहकार्य आणि विकासकेंद्री राजकारणाचा संदेश दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात “सबका साथ, सबका विकास” ही भूमिका राबविली जात असल्याचे सांगत चव्हाण यांनी सोलापूरच्या शहरी व ग्रामीण भागात विकासाची गती वाढल्याचा दावा केला.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना त्यांनी स्थानिक स्तरावर सर्व घटकांना जोडून ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. तसेच महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळालेला व्यापक पाठिंबा हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि संपर्काचा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
याबैठकीत विविध पक्षांतील लोकप्रतिनिधींनी राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविल्याचा दावा करत, येत्या मतदानात महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आश्वासन दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीतील अनेक जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी सोलापुरात महायुतीच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानपरिषद ही केवळ राजकीय पदाची निवड नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना राज्याच्या पातळीवर आवाज देणारे व्यासपीठ असल्याचे सांगत चव्हाण यांनी सोलापूरने एक नवा राजकीय आदर्श निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांमधून आलेल्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम प्रतिनिधी विधानपरिषदेत जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र राऊत विधानपरिषदेत गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समन्वय साधत सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबैठकीतील काही अंतर्गत चर्चांवर भाष्य करण्याचे टाळत चव्हाण यांनी वातावरण खेळीमेळीचे असल्याचे सांगितले. मात्र या बैठकीतून महायुतीने सोलापुरात निवडणुकीसोबतच भविष्यातील राजकीय समन्वयाची पायाभरणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.