एक फोन, समस्यांचे समाधान!
रत्नमंजिरी नगराचा कायापालट; नागरिकांकडून नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक
सोलापूर व्हिजन
जुळे सोलापूर परिसरातील रत्नमंजिरी नगरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना अखेर मार्ग मिळाला असून नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे परिसराचा कायापालट झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रत्नमंजिरी नगरातील रहिवासी समदानी मतेखाने यांनी सांगितले की, त्यांच्या घरासमोर ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी साचून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दुर्गंधी, चिखल आणि रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत होते. तसेच परिसरातील वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेले लाकडी खांब जीर्ण झाल्याने संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

ही समस्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. त्यानुसार जेसीबीच्या सहाय्याने परिसराची स्वच्छता करण्यात आली, रस्त्यावर मुरूम टाकून रोलिंग करण्यात आले आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला.
तसेच महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करून लाकडी खांबाऐवजी लोखंडी विद्युत खांब उभारण्यात आले. त्यावर एलईडी पथदिवे बसविल्याने संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेत भर पडली आहे.
दरम्यान, नगरोत्थान योजनेअंतर्गत रत्नमंजिरी नगरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणही पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या या परिसराला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

“केवळ एका फोननंतर आमच्या समस्या प्रत्यक्ष येऊन ऐकून घेतल्या आणि त्यांचे निराकरण केले. लोकप्रतिनिधी जनतेसाठी कसे काम करू शकतात याचा अनुभव आम्हाला मिळाला,” अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका राजश्री चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचे आभार मानले.