पाठपुराव्याला यश; प्रभाग २६ मधील नागरिकांची वाहतुकीची कोंडी दूर

नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नांतून कृष्णा कॉलनी जोडरस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
सोलापूर व्हिजन
प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांना जोडणाऱ्या कृष्णा कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था अखेर दूर झाली असून नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुरुदेव दत्त नगर १ ते ५, शिक्षक सोसायटी, हेरिटेज फॉर्म, रोहिणी नगर भाग १ व २, ओम गर्जना चौक, द्वारका नगर आणि उद्धव नगर परिसरातील नागरिकांना डी-मार्ट, आयएमएस कॉलेज, आसरा चौक आदी ठिकाणी जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला कृष्णा कॉलनीतील रस्ता दीर्घकाळ दुरुस्त न झाल्याने नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही समस्या नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणेकडून रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात आले. तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी-झुडपे हटविण्यात आली असून चिखलमय ठिकाणी मुरूम टाकून रोलिंगचे कामही करण्यात आले आहे.
रस्ता सुरू झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या तत्परतेचे कौतुक करत परिसरातील उर्वरित प्रलंबित प्रश्नही अशाच पद्धतीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कामासाठी झोन क्रमांक ५ कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे नागरिकांनी नमूद केले. प्रभागाच्या विकासासाठी सुरू असलेला हा पाठपुरावा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.