पालकमंत्री जया भाऊंसह उपाध्यक्ष इंदाभाऊंची केमिस्ट्री जमली….
सात वर्षांचा प्रतीक्षाकाळ संपणार ; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट सातत्यात उतरणार
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाला पुन्हा गती; आचारसंहितेनंतर काम सुरू होण्याचे संकेत
सोलापूर व्हिजन
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न तब्बल सात वर्षांपासून प्रलंबित असला तरी आता या कामाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून वर्षभरात विकासकाम हाती घेण्याचे संकेत दिल्याने शिवप्रेमींसह नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
रंगभवन चौकातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग मानला जातो.



२०१९ मध्ये या परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सभागृह, वाचनालय, स्मारक आणि इतर सुविधा उभारण्याचे नियोजन होते. मात्र प्रस्तावित व्यापारी संकुलाला विविध शिवप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविल्याने विकास आराखड्यावर एकमत होऊ शकले नाही.
यानंतर कोरोना महामारी, निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब यामुळे सुशोभीकरणाचा विषय मागे पडला. दरम्यान जागेची मोजणी, प्राथमिक आराखडा आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू होऊ शकले नव्हते.
शहरातील सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न राहता ते प्रेरणास्थळ बनले पाहिजे. त्यासाठी आकर्षक उद्यान, प्रकाशयोजना, ऐतिहासिक माहिती केंद्र आणि नागरिकांना उपयोगी पडतील अशा सुविधा विकसित करण्याची गरज आहे. परंतु त्यावर आता इंद्रजीत पवार यांनी अभ्यासपूर्ण असा आकर्षक सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे हा विषय आता सर्वत्र आनंदाचा आणि कौतुकाचा तसेच उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट देखील मानला जात आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर हा ड्रीम प्रोजेक्ट तडीस जाईल असा आशावादही व्यक्त केला आहे.
रंगभवन चौकातील हा पुतळा शहरातील शिवरायांचा पहिला पुतळा म्हणून ओळखला जातो. १९६१ मध्ये त्याची स्थापना झाली असून कोल्हापूरचे शिल्पकार सी. के. डोंगरसाने यांनी त्याची निर्मिती केली होती. हातात तलवार घेतलेल्या शिवरायांच्या निग्रही मुद्रेतील हा पुतळा आजही शहराचे लक्ष वेधून घेतो.
आता प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम मार्गी लावण्याचे संकेत दिल्याने सात वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळणार असून, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाला नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
निवडणूक आचारसंहितेनंतर टेंडर काढून वर्षात सुशोभीकरणाचे काम हाती घेऊ
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे. आचारसंहिता संपताच टेंडर काढून वर्षाच्या आतच उद्यानाचा विकास करण्यात येईल.
इंद्रजित पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद