भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात गाजला उत्साह

सोलापूर व्हिजन 
सोलापूर, दि. १ जून

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत राजेंद्र राऊत यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी गजबलले होते. कार्यकर्त्यांनी “राजेंद्र राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा देत उमेदवाराला पाठिंबा दर्शविला.


यावेळी राजेंद्र राऊत यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख भूमिका मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला भाजपचे विविध पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत विजयासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या राजकीय घडामोडींमध्ये या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *