महापालिकेच्या समिती सभापतीपदासाठी इच्छुकांची रणधुमाळी; सहा पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल
महिला-बालकल्याण, स्थापत्य, कामगार कल्याण, विधी व न्याय, उद्यान आणि आरोग्य समित्यांसाठी इच्छुक मैदानात; सभापती निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
सोलापूर व्हिजन
सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेला वेग आला असून बुधवारी विविध समित्यांसाठी इच्छुक नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. समित्यांच्या माध्यमातून शहर विकासाच्या विविध कामांना दिशा मिळणार असल्याने या निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी निर्मला जंगम (प्रभाग क्र. १७) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थापत्य समिती सभापतीपदासाठी विजय चीप्पा (प्रभाग क्र. १३) यांनी अर्ज सादर केला. कामगार कल्याण समिती सभापतीपदासाठी श्रद्धा किरण पवार (प्रभाग क्र. ७) यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

विधी व न्याय समितीच्या सभापतीपदासाठी सत्यजित वाघमोडे (प्रभाग क्र. २३) यांनी अर्ज भरला असून, मंडई व उद्यान समितीच्या सभापतीपदासाठी राजशेखर पाटील (प्रभाग क्र. २३) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी सुनील खटके (प्रभाग क्र. ६) यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
या सर्व उमेदवारी अर्जांनंतर समिती सभापतींच्या निवडीबाबत उत्सुकता वाढली असून, प्रत्येक समितीच्या माध्यमातून शहरातील विकासकामे, आरोग्य सुविधा, महिला व बालकल्याण, कामगार प्रश्न, विधीविषयक कामकाज तसेच उद्यान व मंडई व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या समिती सभापतींची निवड आगामी बैठकीत होणार असून, त्यानंतर संबंधित समित्यांच्या कामकाजाला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात असून, नव्या सभापतींकडून प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.