सोलापूरच्या वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय; ₹१,०२०.५० कोटींच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मुख्यमंत्री फडणवीस यांची गती

NHAIच्या दोन उड्डाणपुलांसह महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा; जमीन संपादन, रेल्वे समन्वय व प्रशासकीय मंजुरी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई / सोलापूर, दि. ३ जुलै

सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत सोलापूरच्या बहुप्रतीक्षित चारपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सुमारे ₹१,०२०.५० कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, दैनंदिन वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषणात मोठी घट होईल. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीलाही या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या सुमारे ९.६६० किलोमीटर लांबीच्या चारपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे शहराभोवती सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. सहा प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे राष्ट्रीय महामार्ग ६५, ५२, १६६ आणि १५० यांना अखंड जोडणी मिळणार असल्याने सोलापूरचे राज्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत होणार आहे.

 

बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळे तातडीने दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. जमीन संपादन, रेल्वे विभागाशी समन्वय, वन विभागाच्या मंजुऱ्या तसेच विविध प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले. राज्य सरकारच्या मालकीची जमीन तातडीने विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

 

प्रकल्पासाठी आवश्यक ३२.०२ हेक्टर जमिनीपैकी २१.५१ हेक्टर जमीन उपलब्ध झाली असून उर्वरित १०.५१ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. खासगी जमिनींचे संपादन, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक मंजुऱ्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार आधुनिक, दर्जेदार आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत, सोलापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, तसेच आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *