जयकुमार गोरे–संजय राऊत वाद पेटला; सोलापुरात भाजयुमोकडून राऊतांच्या पुतळ्याचे दहन, आक्षेपार्ह भाषेचा निषेध
गोरे यांच्या टीकेनंतर राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक; चार हुतात्मा चौकात जोरदार घोषणाबाजी
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२ ऑगस्ट
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात सुरू झालेला राजकीय शाब्दिक संघर्ष आता रस्त्यावर पोहोचला आहे. जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटाच्या राजकीय अस्तित्वावर केलेल्या टीकेनंतर खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सोलापुरातील चार हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध व्यक्त केला.
चार हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची भाषा अस्वीकार्य असल्याचे सांगत राऊत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमोचे शहराध्यक्ष निशांत साळवे यांनी केले.

यावेळी निशांत साळवे म्हणाले, “राजकीय मतभेद असू शकतात; मात्र सार्वजनिक व्यासपीठावर अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नाही. विरोधकांवर टीका करताना सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे. संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने माफी मागावी.”
वादाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर टीका करत, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्व आता संपुष्टात आले असून पक्ष स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत आहे. आगामी निवडणुका कदाचित अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढाव्या लागतील,” असा टोला लगावला होता.
गोरे यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत कठोर आणि आक्षेपार्ह शब्दांत पलटवार केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून राज्यातील विविध भागांप्रमाणेच सोलापुरातही त्याचे पडसाद उमटले.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी आणि ठाकरे गटातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



