हुश्श… प्रश्न सुटला…तब्बल ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांना दिलासा

वेतनासाठी १४.५७ कोटींचा निधी वितरित

तब्बल ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांना दिलासा

चार महिन्यांचे वेतन मिळणार; 

उर्वरित पाच महिन्यांचा निधी लवकर देणार.

मुंबईतील आंदोलन स्थगित.

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.३ ऑगस्ट 

राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलजीवन मिशनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५७ लाखांचा निधी जिल्हास्तरावर वितरित केला असून, त्यामुळे चार महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीनंतर ३ ऑगस्टपासून मुंबईत होणारे आंदोलनही स्थगित करण्यात आले आहे.

 

जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाच्या प्रश्नावर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्तरावर महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. याबैठकीत जिल्हास्तरीय जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन तसेच तालुकास्तरील बीआरसी, सीआरसी आणि वॉश प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

 

राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत आणि बंडू हिवरे यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही शासनाकडे पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला.

 

वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २ कोटी ९२ लाख, बीआरसी- सीआरसी कर्मचाऱ्यांसाठी ७ कोटी २६ लाख आणि वॉश प्रकल्पातील अभियंते व डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या वेतनासाठी ४ कोटी ३८ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्प संचालक डी. गंगाथरण यांच्या पुढाकारामुळे निधी तातडीने जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला.

 

दरम्यान, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्याच्या हिस्स्यातील निधीही उपलब्ध झाला असून तो याच आठवड्यात जिल्ह्यांना वितरित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र शासनाकडेही आवश्यक निधीची मागणी करण्यात आली असून उर्वरित आर्थिक तरतुदीबाबत पाठपुरावा सुरू आहे.

शासनाची सकारात्मक भूमिका

सध्या चार महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असला तरी उर्वरित पाच महिन्यांचे वेतनही लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत असल्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

आंदोलन सध्या स्थगित

जल जीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मुंबईत ३ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित पाच महिन्यांचे वेतन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांची थकबाकी तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी कायम असल्याचे राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *