आदिवासी-पारधी समाजाच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी नव्या कार्यकाळात अधिक प्रभावी भूमिका निभावण्याची अपेक्षा
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.७ ऑगस्ट
भाजपच्या अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकार्यातील सातत्यपूर्ण योगदान, आदिवासी-पारधी समाजाच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार देवराज होळी यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या कोअर कमिटीने विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून राजश्री चव्हाण यांच्या नावाची प्रदेश कार्यकारिणीसाठी शिफारस करण्यात आली.

राजश्री चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत आदिवासी-पारधी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. तसेच जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसंदर्भातही त्यांनी सक्रिय पाठपुरावा केल्याची नोंद पक्षाने घेतली आहे.
पुनर्नियुक्तीनंतर आदिवासी-पारधी समाजासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीचे पक्ष कार्यकर्ते, समर्थक आणि समाजबांधवांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला असून, आगामी काळात समाजहिताच्या विविध प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.