महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राधाश्री निवास येथे सदिच्छा भेट; डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या कार्याचे कौतुक
सोलापूर व्हिजन
सोलापूर शहरातील प्रख्यात गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या विशेष निमंत्रणावरून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरारजी पेठ येथील राधाश्री निवास येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कोठे परिवारातर्फे महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आपुलकीने स्वागत करण्यात आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कोठे परिवारातील सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी परिवारातील महिलांनी महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे औक्षण करून स्वागत केले. पारंपरिक संस्कृतीची झलक पाहायला मिळाल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रख्यात गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश कोठे, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप महिला अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनीष देशमुख, सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुधा अळ्ळीमोरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. “डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यांच्या कार्याची चांगली चर्चा ऐकायला मिळते. त्यांनी यापुढेही समाजासाठी मोठे काम करत राहावे. तसेच येणाऱ्या काळात २०० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवेत अधिक मोठे योगदान द्यावे,” असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
या भेटीमुळे कोठे परिवारासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.