कुंडूबावी येथे महिलेस आणि वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला; संसारोपयोगी साहित्य लुटल्याची तक्रार, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी…
सोलापूर व्हिजन
माढा तालुक्यातील कुंडूबावी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला व तिच्या सासूला मारहाण करून घरातील संसारोपयोगी साहित्य जबरदस्तीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संगीता सिंधू काळे (वय ३५, रा. भांबरे वस्ती, कुंडूबावी ता. माढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्यास असून शेती व शेळीपालन करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी सायंकाळी काही आरोपी घरात घुसले आणि जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांच्या सासू सोनाबाई सोपान काळे यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींनी घरातील संसारोपयोगी साहित्य, भांडीकुंडी आणि इतर वस्तू जबरदस्तीने घेऊन जात घरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेनंतर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून कुंडूबावी पोलिसांत फिर्यादही दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारीतील मुख्य आरोपी अक्षय रविंद्र भोसले याच्यावर यापूर्वीही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले असून तो सध्या मोकाट फिरत असल्याचा आरोप अर्जदार महिलेने केला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.