अखेर ‘त्या’ धोकादायक रस्त्यावर गतिरोधक; विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा

अखेर ‘त्या’ धोकादायक रस्त्यावर गतिरोधक; विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा

डब्लू.आय. टी.कॉलेज ते शांती चौक मार्गावरील वेगवान वाहनांना लगाम; आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुराव्याला यश

सोलापूर व्हिजन 

शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील महालक्ष्मी मंदिर, डब्ल्यू आय टी कॉलेज ते अक्कलकोट रोडवरील शांती चौक हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा आणि अपघातप्रवण बनला होता. वाहनांचा वाढता वेग आणि सततची रहदारी यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता या मार्गावर स्पीड ब्रेकर बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. गतिरोधक नसल्याने अनेक वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत होते. परिणामी, वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने स्थानिक नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.

या समस्येची दखल घेत शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून संबंधित ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने स्पीड ब्रेकर उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी सागर खरोसेकर, दिवान आणि निरंजन घोरपडे यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती देण्यात आली. रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढणार असून भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी वर्गातून आमदार देवेंद्र कोठे तसेच नगरसेविका पूजा वाडेकर यांचे आभार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *