महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, तर सोलापूरचे ‘इन्फ्रा मॅन’ देवेंद्र कोठे!
दमदार आमदाराच्या वाढदिनी विकासकामांचा लेखाजोखा; बी २ पासून विमानसेवा, पाणी आणि आय टी पार्कपर्यंत पाठपुराव्याचा धडाका…

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.८ सप्टेंबर
राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आमदार देवेंद्र कोठे आज सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे पाठपुरावा करणारे युवा नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा ‘इन्फ्रा मॅन’ अशी प्रतिमा असेल, तर सोलापुरात विकासकामांसाठी सातत्याने मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविणारे ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून कोठे यांच्याकडे पाहिले जात आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोठे यांच्यावर सोलापूर शहराची जबाबदारी सोपवली. राम सातपुते यांच्या प्रचारातील त्यांचे वल्याळ क्रीडांगणावरील भाषण चर्चेत आले. त्यानंतर शहर मध्य मतदारसंघात त्यांनी संघटनात्मक ताकद उभी केली आणि काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात मोठे आव्हान निर्माण केले.
याच कामाची पावती म्हणून विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि तब्बल ५० हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. आमदारकीनंतर मात्र विजयाच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
सोलापूरचा बहुचर्चित बी २ प्रश्न मार्गी लावण्यात त्यांच्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले. शहराच्या दळणवळणासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांनाही यश आले असून मुंबई आणि गोवा विमानसेवेने सोलापूरच्या कनेक्टिव्हिटीला नवी दिशा मिळाली आहे.
दररोज पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोठे यांच्या प्रयत्नातून समांतर जलवाहिनीसाठी सुमारे १,४०० कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी आयटी पार्कचा मुद्दाही त्यांनी लावून धरला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची घोषणा केली आहे.
एम.आय.डी.सी.च्या अंतर्गत सुविधांसाठी ५५ कोटींचा निधी, दोन उड्डाणपुलांचा पाठपुरावा आणि सोलापुरात शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विकासकामांसोबतच मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची शैली ही त्यांच्या राजकीय वाटचालीची दुसरी बाजू आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना ‘आश्वासनांपासून अंमलबजावणीपर्यंतचा पाठपुरावा’ हीच त्यांची खरी ओळख ठरत आहे.
अशा दमदार आमदार देवेंद्र कोठे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक :- महेश मालक सग्गम
न्यू सग्गम मंडप & हिव्हेंट्स