मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढावा ; अन्यथा मुंबई पुन्हा जाम करू आंदोलकांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर; सोलापूर-पुणे महामार्गावर ठिय्या

अंतरवली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी; वाहतूक काही काळ ठप्प…

सोलापूर  व्हिजन |  सोलापूर दि.८ सप्टेंबर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातही आंदोलनाची धग पाहायला मिळाली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

 

आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक व प्रवाशांची गैरसोय झाली. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्याऐवजी सरकारने आंदोलकांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या उपोषणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, महामार्गावर आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *