दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी

SIRच्या मतदार यादीत पात्र मतदार सुटू नयेत; राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे…

दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी…

सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि. ८ सप्टेंबर 

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत मतदार यादीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असताना एकही पात्र मतदार यादीबाहेर राहू नये, यासाठी प्रशासनासोबत राजकीय पक्षांनीही सक्रियपणे सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले. मतदार यादीत पात्र नागरिकांचा समावेश करणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे, हा SIRचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात SIRच्या कामकाजाचा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

एकाचवेळी हजारो अर्ज नकोत

SIRच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (BLA) हे बूथ लेव्हल ऑफिसरला (BLO) सहकार्य करत आहेत. मात्र, प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांचे एकत्रितपणे मोठ्या संख्येने अर्ज आणून देण्याऐवजी प्रत्येक पात्र मतदाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह स्वतंत्रपणे सादर करावा, अशी सूचना तेली-उगले यांनी केली.

 

दावे व हरकती दाखल करताना संबंधित पुरावे जोडणे आवश्यक असून, नागरिकांनी निर्धारित मुदतीत आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

६.२२ लाख मतदार ASDD यादीत

जिल्ह्यात १७ जून २०२६ रोजी ३९ लाख ४१ हजार ९५ मतदार होते. SIRनंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ३३ लाख १८ हजार ४२४ मतदार आहेत. प्रारूप यादीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीत ६ लाख २२ हजार ६७१ मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारांच्या संदर्भात पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

 

दरम्यान, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. पूर्वीच्या ३ हजार ७२३ केंद्रांमध्ये १७ केंद्रांची भर पडल्याने आता ३ हजार ७४० मतदान केंद्रे झाली आहेत.

मतदारांनी काय करावे?

 

प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची नागरिकांनी तपासणी करावी. नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता यामध्ये काही त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६पूर्वी दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. सुनावणीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

 

राजकीय पक्षांना SIR प्रक्रियेदरम्यान काही अडचणी किंवा सूचना असल्यास त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने जिल्ह्यात प्रक्रियेच्या आढाव्यासाठी आणखी भेटी होणार असल्याचे तेली-उगले यांनी सांगितले.

 

राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या सूचना

बैठकीत प्रतिनिधींनी स्थलांतरित किंवा अनुपस्थित मतदारांचा समावेश पुन्हा कसा केला जाणार, एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान एकाच केंद्रावर कसे सुनिश्चित केले जाणार, तसेच पात्र मतदार वगळला जाणार नाही यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना मांडल्या. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत प्रशासनाला यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही प्रतिनिधींनी दिली.

 

SIRचे टप्पे एका नजरेत :

३१ ऑगस्ट २०२६ — प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

३० सप्टेंबर २०२६ — दावे व हरकतींची अंतिम मुदत

२९ ऑक्टोबर २०२६ — सुनावणी प्रक्रिया पूर्ण

४ नोव्हेंबर २०२६ — अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *