टीईटी प्रश्नपत्रिका हरियाणाहून दाखल ‘नीट’च्या धड्यानंतर प्रशासनाची कडक खबरदारी; 

टीईटी प्रश्नपत्रिका हरियाणाहून दाखल ‘नीट’च्या धड्यानंतर प्रशासनाची कडक खबरदारी; 

२८ जूनला सोलापूरातील ४७ केंद्रांवर परीक्षा; २८ हजारांहून अधिक उमेदवार, बायोमेट्रिक तपासणीसह कडक सुरक्षा व्यवस्था

टीईटी परीक्षार्थींनो, वेळेआधी केंद्रावर पोहोचा; उशीर झाला तर प्रवेश नाही – प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख 

परीक्षा केंद्र -४७

पेपर-१ साठी परीक्षार्थी संख्या – १२ हजार २६१

पेपर-२ साठी परीक्षार्थी संख्या – १६ हजार ३७

एकूण परीक्षार्थी संख्या – २८ हजार २९८

सोलापूर व्हिजन,

सोलापूर, दि. २६ जून

प्राथमिक शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा रविवारी (२८ जून) सोलापूर शहर व परिसरातील ४७ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. यंदा जिल्ह्यातून पेपर-१ साठी १२ हजार २६१, तर पेपर-२ साठी १६ हजार ३७ उमेदवारांनी नोंदणी केली असून, एकूण २८ हजार २९८ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी 

परीक्षार्थींनी पेपर-१ साठी सकाळी ८.३० वाजेपर्यंत, तर पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविणे व फेस स्क्रीनिंग प्रक्रिया होणार असल्याने वेळेपूर्वी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १०.१० वाजल्यानंतर आणि दुपारी २.१० वाजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेला जाताना प्रवेशपत्रासह मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची छायाप्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, ब्लूटूथ किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षागृहात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची सुविधा हवी असल्यास त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. लेखनिक हा बारावीपेक्षा अधिक शिक्षित नसावा, त्याचे वय १९ वर्षांपेक्षा कमी असावे आणि तो उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नसावा, अशी अट घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर ऐनवेळी लेखनिकास परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तत्पूर्वी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिरक्षक, झोनल अधिकारी, समन्वयक, सहाय्यक परिरक्षक आणि केंद्रसंचालकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी रूपाली भावसार, विस्ताराधिकारी सुदर्शन राठोड आदींच्या उपस्थतीत परीक्षा नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि विविध सूचनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करून परीक्षा केंद्राचा पत्ता आगाऊ तपासून घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व उमेदवारांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हरियाणाहुन आले प्रश्नपत्रिका 

टी. ई. टी. परीक्षेसाठी हरियाणा राज्यातून प्रश्नपत्रिका सोलापुरात दाखल झाल्या आहेत. नीट परीक्षा पेपर फुटल्यानंतर टीईटी परीक्षेची प्रक्रिया अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळले जात आहेत.

टीईटी प्रमाणपत्र वितरण

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २,७४७ टीईटी प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून त्यापैकी २,५०० प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रमाणपत्रे लवकरच संबंधित उमेदवारांना वितरित करण्यात येणार आहेत.

परीक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे

“टीईटी परीक्षा ही शिक्षक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पात्रता परीक्षा आहे. सर्व परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी उपस्थित राहावे, प्रवेशपत्रासह मूळ फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे आणि कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य आणू नये. परीक्षा नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच परीक्षा केंद्राचा पत्ता आगाऊ पाहून अनावश्यक धावपळ टाळावी.”

— कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा महा टीईटी परीक्षा समनियंत्रक, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *