भिवंडीत संशयास्पद प्रश्नपत्रिका आढळल्याने परीक्षा पुढे; पारदर्शकतेसाठी राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय, तपासाला वेग

टीईटीवर पेपरफुटीचे सावट; लाखो उमेदवारांचे भविष्य पुन्हा अधांतरी

भिवंडीत संशयास्पद प्रश्नपत्रिका आढळल्याने परीक्षा पुढे; पारदर्शकतेसाठी राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय, तपासाला वेग

पुणे/ठाणे

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्याने रविवार, दि. २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला घ्यावा लागला. या निर्णयाचा फटका राज्यभरातील सुमारे २ लाख २६ हजार उमेदवारांना बसला असून, परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता आणि सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, राज्यभरातील १ हजार २८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, शनिवारी पहाटे भिवंडी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांची चौकशी केली. या वेळी त्यांच्या ताब्यातील काही प्रश्नांचा टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी मेळ आढळल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली आणि याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या पार्श्वभूमीवर कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये आणि परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी, या उद्देशाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतरच परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, राज्यभरातील लाखो उमेदवारांनी अनेक महिन्यांच्या तयारीनंतर परीक्षेसाठी प्रवास, निवास आणि इतर आवश्यक व्यवस्था केली होती. ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांना आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक फटका बसला असून संतापाची लाट उसळली आहे. स्पर्धा परीक्षांमधील वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे भरती प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत.

 

प्रश्नपत्रिका नेमकी कोणाकडून आणि कशा पद्धतीने बाहेर आली, याचा तपास पोलिस आणि संबंधित यंत्रणा करीत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. टीईटीबाबतची पुढील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून उमेदवारांनी अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टीईटी पेपरफुटीच्या या घटनेने राज्यातील परीक्षा सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या असून, लाखो तरुणांच्या भविष्याशी निगडित परीक्षा अधिक सुरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *