पेपरफुटीमुळे टीईटी पुढे ढकलली; प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती

पेपरफुटीमुळे टीईटी पुढे ढकलली; प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती

सोलापूर जिल्हा परिषदेकडून केंद्रांना तातडीच्या सूचना, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाची धावपळ…

सोलापूर व्हिजन,

सोलापूर, दि.२७ जून

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवार, दि. २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व परीक्षा केंद्रांना तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्याची माहिती वेळेत उमेदवारांपर्यंत पोहोचावी आणि कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी परिपत्रक काढून उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच सर्व केंद्रप्रमुखांनी टीईटी परीक्षेसंबंधी माहिती प्रसिद्ध करावी असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भिवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे झालेल्या पोलिस कारवाईदरम्यान टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी साधर्म्य असलेले काही प्रश्न आढळल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल चौकशी सुरू आहे. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि निष्पक्ष वातावरणात व्हावी, या भूमिकेतूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, सर्व गटशिक्षणाधिकारी, झोनल अधिकारी, सहाय्यक पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुख यांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत. रविवार, दि. २८ जून रोजी कोणत्याही परीक्षा केंद्रावर टीईटीचे आयोजन होणार नसल्याने सर्व केंद्रांवर याबाबतचे फलक व सूचना तत्काळ लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षेसाठी केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना योग्य माहिती देऊन त्यांची गैरसोय टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

राज्यभरातील सुमारे २ लाख २६ हजार उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या परीक्षेवर पेपरफुटीच्या संशयाचे सावट आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये आणि परीक्षेची विश्वासार्हता कायम राहावी, यासाठीच परीक्षा पुढे ढकलल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता उमेदवारांचे लक्ष परीक्षा परिषदेच्या पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार नाही.

“टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रविवार, दि. २८ जून रोजी कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार नाही. सर्व केंद्रप्रमुखांनी ही माहिती दर्शविणारे फलक तातडीने लावावेत. उमेदवारांनी अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच विश्वास ठेवावा. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

— कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सोलापूर तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समन्वय समिती

 

परीक्षेची सुधारित तारीख संकेतस्थळावर जाहीर करणार 

परीक्षेची सुधारित तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार असल्याने उमेदवारांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देशही सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *