लोधी समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार देवेंद्र कोठे यांची घोषणा 

शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंड; माँ शितलादेवीच्या आषाढ महायात्रेने सोलापूर भक्तीमय

हजारो भाविकांची उपस्थिती; महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही भक्तांचे आगमन, लोधी समाजाच्या सामूहिक श्रद्धेचा अनोखा सोहळा

लोधी समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार देवेंद्र कोठे यांची घोषणा 

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.९ ऑगस्ट

परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा अनोखा संगम ठरलेली लोधी समाजाची शेकडो वर्षांची माँ शितलादेवी आषाढ महायात्रा रविवारी सोलापूरात उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत होती. दिवसभर पूजा-अर्चा, नैवेद्य आणि सामूहिक दर्शनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

लष्कर येथील नळबाजार चौकातील माँ शितलादेवी मंदिर तसेच हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका येथील मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवीला नैवेद्य-प्रसाद अर्पण करून भक्तांनी मनोभावे पूजा-अर्चा केली. सोलापूरसह मुंबई, पुणे, संभाजीनगर तसेच कर्नाटकातील विजापूर परिसरातूनही भाविक दर्शनासाठी आले होते.

एकाच दिवशी सामूहिक आषाढ महायात्रेची परंपरा

 

शितला देवीचा वार रविवार असल्याने लोधी समाजात आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एका शुभ रविवारी सामूहिकरीत्या आषाढ महायात्रा साजरी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. या दिवशी समाजातील हजारो बांधव एकाच दिवशी देवीची पूजा करून ही परंपरा जपतात. त्यामुळे महायात्रेला धार्मिकतेबरोबरच समाजातील एकोपा आणि सांस्कृतिक वारशाचेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संध्याकाळी पाच वाजता शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार समाजबांधव, माता-भगिनी आणि लहान मुले नवीन वस्त्रे परिधान करून नैवेद्य-प्रसादासह एकत्र आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि माँ शितलादेवीच्या जयघोषात हजारोंच्या संख्येने भाविक रंगभवन, पत्रकारनगर येथील वनशितलादेवीच्या महापूजेसाठी एकत्रित झाले. सामूहिक महापूजा, दर्शन आणि नैवेद्य-प्रसादाच्या कार्यक्रमाने परिसर भक्तीमय झाला.

मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली

लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि समाजातील पंच, कुटुंबप्रमुख व मुरब्बीगण यांच्या नेतृत्वाखाली महायात्रेचे आयोजन करण्यात आले. वनशितला देवीच्या दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर अविनाश कोंड्याल, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार शिवशरण पाटील तसेच लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत भारत बडुरवाले, रविसिंग कैय्यावाले, धनश्याम शिवसिंगवाले, रणजीत दवेवाले, नागनाथ शिवसिंगवाले, अॅड. सुरजसिंग लोधा, परशुराम सतारेवाले, हनुमान चौधरी, लक्ष्मण बंबेवाले आदींनी केले.

परंपरेतून जपला सामाजिक एकोपा

या महायात्रेच्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ, युवा, माता-भगिनी आणि बालक एकाच ठिकाणी एकत्र येत असल्याने धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकी आणि परस्पर स्नेह अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रामसिंग सतारेवाले, किसनसिंग कजाकवाले, मानसिंग कोलाकटी, सोबुराम शिवसिंगवाले, बंसीसिंग कैय्यावाले, भरतसिंग मदनावाले, कन्हैयासिंग खंडेवाले, अशोकसिंग बुकेवाले, अर्जुनसिंग रिसालदार, मोहनसिंग मौलावाले यांच्यासह समाजातील अनेक पंच, मुरब्बीगण व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माँ शितलादेवीच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने रंगलेली ही आषाढ महायात्रा लोधी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रभावी दर्शन घडवून गेली.

लोधी समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार देवेंद्र कोठे

लोधी समाजाच्या विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना दिले. लोधी भवन उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, वनशितलादेवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तसेच बालाजी मंदिर परिसराच्या विकास व सुधारणा कामांसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक ते सहकार्य सातत्याने केले जाईल, असेही आमदार कोठे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *