‘वहीत केवळ धडे नव्हे, तर स्वप्नं आणि अपयशही लिहा’; डॉ. सूर्यप्रकाश कोठेंचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त मनपा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

सोलापूर व्हिजन सोलापूर दि.११ ऑगस्ट
“या वहीत केवळ अभ्यासाचे धडे लिहू नका; तुमची स्वप्ने, भविष्याची उद्दिष्टे आणि झालेली अपयशेदेखील लिहून काढा. त्यातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल,” असा प्रेरणादायी संदेश डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) कॅम्प येथील मनपा मुलांची मराठी केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, एम.बी.बी.एस., एम.डी., डी.एम. (गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी), कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट व जी.आय. एन्डोस्कोपिस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कोठे यांनी स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या कार्याचा संदर्भ देत “मोठे होण्यासाठी परिस्थितीपेक्षा जिद्द महत्त्वाची असते,” असा संदेश दिला. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी दोन शाळा उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
शैक्षणिक साहित्याचे वाटप हा केवळ वस्तू देण्याचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या हस्ते देवी सरस्वतीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर शाळेतील शिक्षकांच्या वतीने डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
‘वही’ ठरावी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सुरुवात
स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी फक्त वही भरू नये, तर स्वप्नं, ध्येय आणि अपयशातून मिळालेले धडे लिहून स्वतःचे भविष्य घडवावे, हा विचार पुढे आला. त्यामुळे वही वाटपाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.