जि.प.सदस्य दादासाहेब लवटे यांच्या १६ मुद्द्यांनी प्रशासनाला धरले धाऱ्यावर
वारीच्या खर्चापासून रिक्त पदे, निविदा आणि सदस्य निधीपर्यंत प्रश्नांची सरबत्ती; पुढील सभेपूर्वी कार्यवाहीची मागणी
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.१४ ऑगस्ट
जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महूद गटाचे सदस्य दादासाहेब भगवान लवटे यांनी विविध विभागांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तब्बल १६ मुद्दे सभागृहासमोर मांडले. आषाढी वारीतील खर्चाची माहिती, चष्मा खरेदीची चौकशी, बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिया, २,०३९ रिक्त पदे, नवीन सदस्यांना निधी आणि शाळांच्या गणवेश वाटपातील अनियमितता या विषयांवर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

लवटे यांनी आषाढी वारीसाठी झालेल्या विविध खर्चाची सविस्तर माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली. चष्मा खरेदीसाठी अवघ्या सहा दिवसांत ५० लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी या निविदेच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप सभागृहासमोर का ठेवण्यात आला नाही, असा सवाल केला. डिजिटल बॅनरसाठी ६.५ कोटींचे बजेट आणि औषध खरेदीसाठी १० कोटींच्या खर्चाचीही त्यांनी माहिती मागितली.
सभागृहात मांडलेल्या सर्व १६ मुद्द्यांवर पुढील सर्वसाधारण सभेपर्यंत कार्यवाही करून लेखी माहिती द्यावी, अशी मागणी लवटे यांनी केली. तसेच सदस्यांना अधिकाधिक विषय मांडण्यासाठी पुढील सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. लवटे यांच्या मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कार्यपद्धतीसह निधीवाटप, निविदा प्रक्रिया, रिक्त पदे आणि वारी खर्चाच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२,०३९ पदे रिक्त; कामाचा ताण वाढला
जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये २,०३९ पदे रिक्त असल्याकडे लक्ष वेधत लवटे यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. ग्रामपंचायत १० टक्के कर्मचारी कोटा भरतीची प्रक्रियाही केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चतुर्थ श्रेणी पदोन्नतीतून ३५ आरोग्य सेवकांची पदे भरण्याची फाईल प्रलंबित असल्याचे सांगत पदोन्नतीचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली.
सदस्य निधी कुठे? विकासकामे कधी?
नवीन जिल्हा परिषद सदस्यांना सहा महिने उलटूनही कोणताही निधी मिळालेला नसल्याचा मुद्दा लवटे यांनी मांडला. निधीअभावी विकासकामे रखडली असून सदस्यांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनासमोर ठेवला.
निविदांमध्ये पक्षपाताचा आरोप
बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेवरही लवटे यांनी गंभीर आक्षेप घेतला. विशिष्ट कार्यकर्ते किंवा पक्षाशी संबंधित व्यक्तींनाच कामे दिली जात असल्याचा आरोप करत कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदाराची निविदा कारण नसताना रद्द का केली जाते, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रक्रियेत संबंधित अधिकारी कोण आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याचे उत्तर सभागृहाला देण्याची मागणी त्यांनी केली.
वारीच्या शिल्लक ३२ लाखांचा मुद्दा
आषाढी वारीचा खर्च वजा जाता ३२ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगत लवटे यांनी महूद, आचकदानी, चिकमहूद आणि लोटेवाडी या गावांना स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची मागणी केली. मागणी करूनही निधी का देण्यात आला नाही आणि उर्वरित निधीचा विनियोग कसा होणार, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. वारीत खरेदी केलेली औषधे व अन्य साहित्य शासनाला परत न करता जिल्हा परिषदेला वापरण्याची तरतूद आहे का, याबाबतही त्यांनी प्रशासनाला विचारणा केली.
गणवेश, ड्रोन अनुदान आणि गोबर गॅसवरही प्रश्न
जिल्हा परिषद शाळांतील गणवेश वाटपात बचत गटांना डावलून विविध संस्थांकडून कपडे घेतले जात असल्याचा मुद्दा लवटे यांनी उपस्थित केला. गणवेश खरेदीची प्रक्रिया, कापडाची गुणवत्ता आणि मापाबाबतची माहिती सभागृहाला देण्याची मागणी त्यांनी केली.सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने गोबर गॅस आणि बायोगॅस योजनेला गती देऊन अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. महिला सक्षमीकरणासाठी कृषी विभागाच्या ड्रोन खरेदीसाठी असलेला निधी इतरत्र वळवू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करताना लवटे यांनी जिल्हा परिषद सभागृहात महापुरुषांचे फोटो लावण्याचा स्थायी समितीचा ठराव अद्याप का अंमलात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. सांगोला पंचायत समितीतील यांत्रिकी विभागातील वाहनचालक व मदतनीस पदांच्या निविदा आणि रिक्त पदांच्या नियमितीकरणाचाही मुद्दा त्यांनी मांडला.