डीसीसी बँकेसाठी कुछ भी करेगा…भाजपमध्येच ‘शह-कटशह’!

डीसीसी बँकेसाठी भाजपमध्येच ‘शह-कटशह’!

कल्याणशेट्टींच्या बैठकीनंतर दक्षिण सोलापुरात दुसऱ्या गटाची स्वतंत्र मोर्चेबांधणी; सहकारातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.७ ऑगस्ट

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याआधीच भाजपच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यात बैठका आणि गटबांधणीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या राजकीय वाटचालीला बळ देण्यासाठी बैठक घेतल्याची चर्चा असतानाच, भाजपमधील दुसऱ्या सहकारातील प्रभावी गटाने स्वतंत्र बैठक घेतल्याने पक्षांतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

 

जिल्हा बँकेवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१८ पासून बँकेवर प्रशासक असल्याने आता न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदारयादीसाठी अर्हता तारीख जाहीर झाल्याने सोसायट्यांचे ठराव, मतदारसंघनिहाय गणित आणि संभाव्य उमेदवारांची जुळवाजुळव याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपने जिल्हा बँक ताब्यात घेण्याची रणनीती आखली असून, त्यासाठी सहकारातील स्थानिक ताकद महत्त्वाची ठरणार आहे. अनेक विद्यमान आमदार आणि प्रभावी नेते बँकेच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याने प्रत्येक तालुक्यातील समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

दक्षिण सोलापुरात बैठकीने वाढवली उत्सुकता

आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधून सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी दक्षिण सोलापूरमध्ये माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासाठी बैठक घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीनंतर संबंधित सोसायट्यांच्या ठरावांच्या हालचालींनाही वेग आल्याची चर्चा आहे.

मात्र, या हालचालींमुळे दक्षिण सोलापुरातील भाजपच्या स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याणशेट्टी-हसापुरे यांच्या समीकरणाला प्रत्युत्तर म्हणून सहकारातील प्रभावी नेत्यासोबत भाजपमधील दुसऱ्या गटाने स्वतंत्र बैठक घेतल्याची चर्चा आहे.

सहकारातील ताकद ठरणार निर्णायक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केवळ पक्षाचे चिन्ह किंवा राजकीय पद महत्त्वाचे ठरणार नाही. सोसायट्या, नागरी सहकारी बँका, सहकारी संस्थांमधील संपर्क आणि स्थानिक पातळीवरील मतदारांचे गणित यावर विजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दक्षिण सोलापुरात प्रत्येक गट आपापली ताकद तपासण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे कल्याणशेट्टी यांनी आपले राजकीय समीकरण विस्तारण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भाजपमधीलच दुसरा गट सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डीसीसी बँकेची निवडणूक ही केवळ सहकाराची निवडणूक न राहता भाजपमधील स्थानिक नेतृत्वाची ताकद आजमावणारी लढत ठरण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांचा ‘ब्रेक’ की पडद्यामागे समेट?

भाजपमधील दुसऱ्या गटाने घेतलेल्या बैठकीची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत मतभेद निवडणुकीच्या मैदानात उघड होऊ नयेत, यासाठी वरिष्ठांकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दक्षिण सोलापुरातील विद्यमान आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने पुढील राजकीय गणित अधिक रंजक झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कोणता गट कोणाच्या मागे उभा राहतो, सोसायट्यांचे ठराव कोणाच्या बाजूने जातात आणि अखेरीस भाजपमध्येच सहमती होते की स्वतंत्र पॅनेलची तयारी सुरू होते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या हालचालींमुळे दक्षिण सोलापुरातील भाजपच्या राजकारणात ‘एकजुटी’पेक्षा ‘ताकद कुणाची?’ हा प्रश्न सध्या अधिक चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *