गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी-रथ मिरवणूक

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिभावाचे स्वरूप; आज भव्य पालखी-रथ मिरवणूक, रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर व्हिजन | अक्कलकोट, दि.२८ जुलै
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन २९ जुलै (सायं. ४ वाजता) करण्यात आले असून, हजारो स्वामीभक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मिरवणूक पार पडणार आहे.
मंडळाच्या नवीन वाहनतळ शेड परिसरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत विविध दिंड्या, पारंपरिक वाद्यांचा गजर, मुंबईच्या स्वरांजली बँडपथकाचे सादरीकरण, विजुभाई तांडेल यांच्या आराध्य ढोलपथकाचा दमदार निनाद तसेच अमोलराजे लेझीम संघाच्या आकर्षक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
या पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ आ.शेखर निकम, भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार, नगरसेवक अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नितीन हबीब, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, शिक्षण सभापती संकेत पिसे, मुंबईचे नगरसेवक विजु तांडेल, देणगीदार सायन संतोष नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्वेता हल्ले या करणार आहेत.
दरम्यान, गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त २७ ते २९ जुलैदरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सामाजिक बांधिलकी जपत अनेक स्वामीभक्त रक्तदानासाठी पुढे सरसावत आहेत.

मंडळाच्या वतीने सर्व स्वामीभक्तांना गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, श्री स्वामींचे दर्शन, महाप्रसाद आणि सेवा उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मेजय राजे भोसले यांनी केले आहे. सदर धार्मिक कार्यक्रम वेळेवर संपन्न होणार असल्याने स्वामी भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.