महापौरांच्या प्रभागातच चिखलाचे साम्राज्य; विद्यार्थी, कामगारांचा रोजचा जीवघेणा प्रवास
तिरूमला चौक–थोबडे वस्ती मार्ग १० ते १५ वर्षांपासून दुरवस्थेत; पाणीगळती, सांडपाणी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप
सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.२७ जुलै
शहराच्या सर्वांगीण विकासाचे दावे केले जात असताना सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रभाग क्रमांक १२ मधील तिरूमला चौक ते थोबडे वस्ती हा प्रमुख रस्ता गेल्या १० ते १५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या मार्गावर दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कामगार आणि नागरिकांना चिखल, साचलेले पाणी आणि खड्ड्यांतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या रस्त्यावरून नेताजी शाळा, महात्मा विद्या मंदिर तसेच परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असल्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशावर चिखल उडतो, तर अनेकदा सायकल घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. कामावर जाणाऱ्या कामगारांनाही दररोज याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी मुरूम व माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते; मात्र कायमस्वरूपी काँक्रीट किंवा डांबरी रस्ता करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होताच रस्त्याची अवस्था पूर्ववत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येमागे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावेळी होणारी पाणीगळती आणि परिसरातील काही उद्योगांकडून रस्त्यावर सोडले जाणारे सांडपाणी ही प्रमुख कारणे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रस्ता वर्षभर ओलसर व चिखलयुक्त राहत असून वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांनी अनेक वर्षे या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले असून नागरिकांनी त्यांच्यावर सातत्याने विश्वास दाखविला आहे. त्यामुळे शहराच्या विकासाचा आराखडा राबविताना स्वतःच्या प्रभागातील हा मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तिरूमला चौक ते थोबडे वस्ती या मार्गावरील पाणीगळती तातडीने थांबविणे, सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि दर्जेदार कायमस्वरूपी रस्त्याचे काम हाती घेणे, ही काळाची गरज असल्याचे स्थानिकांचे मत आहे. विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास, कामगारांची दैनंदिन गैरसोय आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास या तिन्ही बाबी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.