गोकर्ण आत्मलिंगावर पडली सूर्यकिरणांची प्रभा; सोलापुरात अनोखा किरणोत्सव
मानाच्या लड्डू गणपती मंडळाच्या देखाव्यात निसर्गाचा अद्भुत आविष्कार; दर्शनासाठी नागरिकांची गर्दी
सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि. १९ सप्टेंबर
गणेशोत्सवातील देखावे केवळ कलाकुसरीपुरते मर्यादित न राहता त्यातून धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभूती देण्याचा प्रयत्न सोलापुरातील मंडळांकडून केला जात आहे. आंध्र दत्त चौक, कुचन नगर, दाजी पेठ येथील नूतन आंध्र दत्त सामाजिक संस्था मानाचा लड्डू गणपती मंडळाने यंदा साकारलेल्या गोकर्ण आत्मलिंगाच्या देखाव्यात शनिवारी निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. सूर्याची किरणे थेट आत्मलिंगाच्या मूर्तीवर पडल्याने काही काळ गाभारा सूर्यप्रकाशाने उजळून निघाला. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली.

मंडळाने यंदा गोकर्ण येथील प्रसिद्ध आत्मलिंग मंदिराची प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहे. मंदिराची उभारणी करताना वास्तुरचनेतील बारकावे जपण्यासोबतच मंदिरावरील कोरीव व रेखीव कामालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गोकर्ण मंदिराचा अनुभव देणारा हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, शनिवारी सूर्याची किरणे आत्मलिंगावर पडल्याने देखाव्याला एक वेगळेच आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले. गाभाऱ्यात सूर्यकिरणांची प्रभा पडताच उपस्थित भाविकांनी हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. निसर्ग आणि कलाकृती यांचा झालेला हा संगम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.
खा. ज्योती वाघमारे आणि आ.देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रमांक नऊतील सर्व नगरसेवक आणि मंडळाच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
मंडळाच्या वतीने दररोज रात्री साडेअकरा वाजता ‘महानक्षत्रम आरती’ आयोजित करण्यात येत आहे. भाविकांनी गोकर्ण आत्मलिंगाचा देखावा तसेच रात्री होणाऱ्या आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.