गौरीसोबत ‘गणगोता’; नैवेद्यासाठी मटणाची अनोखी रीत

गौरीसोबत ‘गणगोता’; नैवेद्यासाठी मटणाची अनोखी रीत

सोलापुरातील वाडेकर कोकणी कुटुंबांनी शंभर वर्षांची परंपरा आजही ठेवली जिवंत

सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.१८ सप्टेंबर  

गौरी अर्थात महालक्ष्मीच्या पूजनाला गोडधोड नैवेद्य दाखवण्याची प्रथा सर्वत्र आढळते. मात्र, सोलापुरात स्थायिक झालेल्या काही कोकणी कुटुंबांची गौरीपूजनाची परंपरा यापेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे गौरीचे आवाहन एकाच रूपात केले जाते आणि ती आपल्या ‘गणगोतासह’ येते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गौरीला गोड पदार्थांचा नैवेद्य, तर तिच्यासोबत आलेल्या गणगोताच्या आदरातिथ्यासाठी मटणाचा नैवेद्य दाखवण्याची पिढ्यान्‌पिढ्यांची परंपरा आजही जपली जात आहे.

सोलापुरातील वाडेकर कुटुंबासह आठ ते दहा कोकणी कुटुंबांमध्ये ही प्रथा आजही कायम आहे. सुमारे शंभर जण या परंपरेचे पालन करतात. कोकणातून सोलापुरात स्थलांतरित झालेल्या या कुटुंबांनी बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांच्या धार्मिक पद्धती आणि सांस्कृतिक परंपरेची नाळ तुटू दिलेली नाही.

 

इतर अनेक कुटुंबांमध्ये दोन गौरींचे पूजन केले जाते. मात्र, या कोकणी कुटुंबांमध्ये एकाच गौरीचे आवाहन केले जाते. ‘महालक्ष्मी एकटी येत नाही, ती आपल्या गणगोतासह येते,’ अशी श्रद्धा असल्याने तिच्या गणगोताचेही पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते.

 

नैवेद्यापूर्वी पडदा 

या परंपरेतील आणखी एक विशेष बाब म्हणजे मटणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत. मांसाहारी नैवेद्य दाखवताना गणपती आणि गौरी यांच्यामध्ये पडदा लावला जातो. त्यानंतरच गणगोतासाठी मटणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. या संपूर्ण विधीत पूर्वजांनी सांगितलेल्या पद्धतीचे काटेकोरपणे पालन केले जाते.

गोडासोबत मांसाहारी आणि शाकाहारी मेजवानी

गौरीसाठी पालेभाज्या, चपाती, भात, वरण आणि विविध गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो. तर गणगोतासाठी मटण, भाकरी, भात, कांदा, टोमॅटो आणि वडे असा मांसाहारी नैवेद्य असतो. गौरीपूजनानंतर सुवासिनीला भोजन देण्याचीही प्रथा आहे.

गौरी गणपतीच्या या दिवसांत सोलापुरात मटण खाणे अनेक कुटुंबांत वर्ज्य मानले जाते. त्यामुळे नात्यातील महिलेला सुवासिनीचा मान देऊन भोजन देण्याची पद्धत काही कुटुंबांनी स्वीकारली आहे.

“गणगोता ही आमच्या परंपरेची सर्वाधिक वेगळी ओळख आहे. गौरी आपल्या गणगोतासह येते, अशी आमची श्रद्धा असून पूर्वजांकडून चालत आलेली ही पद्धत आम्ही आजही जपतो,” असे रूपाली वाडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *