जन्माष्टमीच्या भक्तिमय सोहळ्याने सेटलमेंट परिसर दुमदुमला नगरप्रदक्षिणेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; १०३ वर्षीय शिवलाल स्वामी महाराजांचा भक्तांना सदाचाराचा संदेश

जन्माष्टमीच्या भक्तिमय सोहळ्याने सेटलमेंट परिसर दुमदुमला

नगरप्रदक्षिणेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; १०३ वर्षीय शिवलाल स्वामी महाराजांचा भक्तांना सदाचाराचा संदेश

सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.६ सप्टेंबर 

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रभाग क्रमांक २२ मधील सेटलमेंट फ्री कॉलनी, चव्हाण वस्ती परिसरातील श्रीकृष्ण अध्यात्मिक मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी झालेल्या भक्तिमय गुलाल सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘गोविंदा’च्या जयघोषात भाविकांनी काढलेल्या नगरप्रदक्षिणेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गुलाल सोहळ्याच्या प्रारंभी श्रीकृष्ण अध्यात्मिक मठापासून संपूर्ण सेटलमेंट परिसरातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. हातात भगवे ध्वज, मुखी श्रीकृष्णाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष, युवक तसेच वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने या नगरप्रदक्षिणेत सहभागी झाले.

 

या सोहळ्याला १०३ वर्षीय ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित भाविकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक महत्त्व पटवून देताना भगवान श्रीकृष्णांनी दिलेला प्रेम, भक्ती, कर्म, सत्य आणि धर्माचा संदेश जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.

 

‘भक्ती केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता ती आचरणातून दिसली पाहिजे. श्रद्धेसोबत सदाचार आणि कर्माला प्रामाणिकपणाची जोड मिळाल्यास जीवनाला सकारात्मक दिशा मिळते,’ असा संदेश शिवलाल स्वामी महाराजांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

 

दरम्यान, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी श्रीकृष्ण भगवानांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेत उपस्थित भाविकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

 

जन्माष्टमीच्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने सामाजिक सलोखा आणि भक्तिभावाचे दर्शन घडले.

 

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव, नागेश मामा बाबुराव गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, लहू गायकवाड, सुधीर बहिरवाडे, श्रीकांत श्रीराम जाधव, सचिन विलास जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील भाविक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *