विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सवाच्या नेतृत्वाची धुरा विश्वनाथ कोळींच्या खांद्यावर ; रिअल इस्टेट क्षेत्रातील युवा उद्योजकाची सामाजिक क्षेत्रातही दमदार वाटचाल

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सवाच्या नेतृत्वाची धुरा विश्वनाथ कोळींच्या खांद्यावर

रिअल इस्टेट क्षेत्रातील युवा उद्योजकाची सामाजिक क्षेत्रातही दमदार वाटचाल

सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.५ सप्टेंबर

रिअल इस्टेट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण करणारे युवा उद्योजक मा. विश्वनाथ (आण्णा) कोळी यांच्या नेतृत्वाला आता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व्यासपीठाची नवी दिशा मिळाली आहे. विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थक आणि मित्रपरिवारातून आनंद व्यक्त होत असून, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्यवसाय क्षेत्रातील धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या विश्वनाथ कोळी यांनी आपल्या कार्यपद्धतीतून तरुण उद्योजकांमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. व्यावसायिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाताना घेतलेले निर्णय, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि मित्रपरिवाराला सातत्याने दिले जाणारे पाठबळ यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

 

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि समाजोपयोगी उपक्रमांचे माध्यम बनत आहे. त्यामुळे मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. या माध्यमातून उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचे आव्हान कोळी यांच्यासमोर असणार आहे.

 

दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी विश्वनाथ कोळी यांचा वाढदिवसही साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला यशाची नवी उंची लाभावी, नेतृत्वाची वाटचाल अधिक व्यापक व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम घडावेत, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

कोळी समाजाचे नेते अंबादास कोळी, गोविंद राठोड तसेच मित्रपरिवाराच्या वतीने विश्वनाथ कोळी यांना वाढदिवसाच्या आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *