मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याकडे सोलापूरचे लक्ष; विकासाच्या महाघोषणांची जनतेला उत्सुकता…

सोलापूर व्हिजन
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याच्या सोलापूर दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, त्यांच्या भाषणातून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणांची अपेक्षा व्यक्त होत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार, धार्मिक पर्यटन, वाहतूक सक्षमीकरण आणि गुंतवणूक या सर्वच आघाड्यांवर मुख्यमंत्री फडणवीस ठोस दिशा देतील, असा विश्वास नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि युवा वर्गातून व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायासह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. या प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना आधुनिक सुविधा मिळतील, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.
यासोबतच सोलापूरच्या तरुणांच्या भवितव्यासाठी आयटी पार्क उभारणीची घोषणा होणे काळाची गरज मानली जात आहे. माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि सेवा क्षेत्रातील संधी सोलापूरमध्ये उपलब्ध झाल्यास हजारो युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल आणि शहराचे आर्थिक चित्र बदलू शकते.
विमानसेवा विस्ताराच्या दृष्टीने सोलापूर-तिरुपती विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी वाढत आहे. तसेच होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि आपत्कालीन सेवांसाठी सोलापूरला नवे बळ मिळणार आहे.
राज्य आणि देशाच्या विकासदृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शक्तिपीठ महामार्ग तसेच सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे संदर्भात सोलापूरला प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास सोलापूर राष्ट्रीय वाहतूक, व्यापार आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणून पुढे येऊ शकते.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन उड्डाणपुलांची घोषणा होणे आवश्यक मानले जात आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
तसेच सोलापूरमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक व रोजगार निर्मिती यासाठी विशेष पॅकेज जाहीर झाल्यास जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवी चालना मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उद्याच्या भाषणातून सोलापूरच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप समोर येईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. आता सोलापूरकरांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरलेला हा दौरा विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.