डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्ग सुरक्षा व ट्रॉमा केअर हॉस्पिटलसाठी महत्त्वपूर्ण मागण्या…

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्ग सुरक्षा व ट्रॉमा केअर हॉस्पिटलसाठी महत्त्वपूर्ण मागण्या

सोलापूर व्हिजन

सोलापूर शहरातील प्रख्यात गॅस्ट्रोलॉजिस्ट व सामाजिक बांधिलकी जपणारे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी महामार्गांवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न केंद्रीय स्तरावर मांडत महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे अध्यक्ष डॉ. संजयकुमार मंटाळे यांच्यासमवेत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा, ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारणी आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबत सविस्तर निवेदन सादर केले..

ही भेट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पार पडली. यावेळी IMA अध्यक्ष डॉ. संजयकुमार मंटाळे, डॉ. सचिन बोंगारगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

भेटीदरम्यान डॉ. सूर्यप्रकाश कोठे व शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा स्वामी समर्थांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महामार्ग सुरक्षेसह आरोग्य व्यवस्थेवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वेगाने विस्तारत असताना अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. अपघातानंतरची पहिली एक तासाची वेळ म्हणजेच “Golden Hour” ही जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी महामार्गांलगत सक्षम आणि तातडीच्या आरोग्य सुविधांची आवश्यकता अधोरेखित करत काही महत्त्वपूर्ण मागण्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीन गडकरी ठामपणे मांडल्या.

यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी, प्रत्येक ५० ते १०० किलोमीटर अंतरावर हायवे इमर्जन्सी मेडिकल युनिट सुरू करणे, GPS यंत्रणेसह सुसज्ज ॲम्बुलन्स नेटवर्क निर्माण करणे, खासगी व शासकीय रुग्णालयांचा महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय वाढवणे, अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमेला अधिक बळ देणे या मागण्यांचा समावेश होता.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीन गडकरी यांनी निवेदनातील विषय गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. “निवेदनामध्ये मांडलेले विषय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचवून ते लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी महामार्ग अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा मुद्दा विशेषत्वाने मांडत, “महामार्ग विकासासोबत सक्षम आपत्कालीन आरोग्य व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यास हजारो नागरिकांचे प्राण वाचू शकतात,” असे मत व्यक्त केले.

महामार्गांवरील अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात असून वैद्यकीय क्षेत्रातून सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न प्रभावीपणे राष्ट्रीय स्तरावर मांडल्याबद्दल त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *