पीकविमा, हमीभाव आणि महागाईविरोधात रस्ता रोको; खासदार प्रणिती शिंदे यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

मुंडन आंदोलनातून सरकारला इशारा”; शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा सोलापुरात जनआक्रोश
पीकविमा, हमीभाव आणि महागाईविरोधात रस्ता रोको; खासदार प्रणिती शिंदे यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल


सोलापूर व्हिजन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसने सोमवारी सोलापुरात आक्रमक भूमिका घेत मार्केट यार्ड चौकात भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन केले. सोयाबीनला पीकविमा, कांद्याला हमीभाव, खत-बियाण्यांच्या वाढत्या किमती, डिझेल तुटवडा आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ झालेल्या या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
“राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा अडचणीत आला आहे,” असा आरोप करत शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेती मशागत महागली असून खरीप हंगामाच्या तोंडावर खत-बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींनी शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
सोयाबीन, तूर आणि कांद्यासारख्या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे सांगत त्यांनी पीकविमा योजनांतील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित केले. “खते वापरू नका” या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीका करत, “खते न वापरता शेती करायची कशी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून मुंडन आंदोलन केले. उत्तर सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनीही सरकारविरोधात संताप व्यक्त करत आंदोलनात सहभाग घेतला. “ही फक्त सुरुवात असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जनआक्रोश आणखी तीव्र केला जाईल,” असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा, तालुका आणि शहर पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *