500 किमींचा पाठलाग अन् आंतरराज्यीय कारचोरांचा पर्दाफाश!
बनावट नंबर प्लेटने पोलिसांची दिशाभूल; फौजदार चावडी डीबी पथकाने 15 दिवसांत उघड केले 5 गुन्हे
तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि.१२ जून
कार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने तब्बल 500 किलोमीटरचा माग काढत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. तेलंगणातील निझामाबाद येथून एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन चोरीच्या कार आणि गुन्ह्यात वापरलेली एक कार असा सुमारे 24.85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुरारजी पेठेतील अवंतीनगर परिसरातून 19 मे रोजी रात्री स्विफ्ट डिझायर कार चोरीला गेल्याची तक्रार फौजदार चावडी पोलिसांकडे दाखल झाली होती. घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नसतानाही डीबी पथकाने परिसरातील विविध कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारचा संशयास्पद वावर आढळून आला. तपासादरम्यान त्या वाहनावर बनावट नंबर प्लेट लावून पोलिसांची दिशाभूल केल्याचे समोर आले.
सपोनि. संजय क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमरगा, लातूर, उदगीर, मुखेड मार्गे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेपर्यंत तपासाचा धागा पकडला. सलग 15 दिवस दिवस-रात्र मेहनत घेत विविध सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. अखेर तेलंगणातील बोधन येथे संशयित वाहनाचा मूळ क्रमांक शोधण्यात पोलिसांना यश आले.
तांत्रिक तपासाच्या आधारे निझामाबाद येथे छापा टाकून समद मेहमुद शेख (खान, वय 32) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार हजरत खान याच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत वाहनचोरी केल्याची कबुली दिली. आरोपी कारची काच फोडून विशेष इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या मदतीने काही मिनिटांत वाहन सुरू करून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
या टोळीने सोलापूर, धाराशिव, अकोला, यवतमाळसह अन्य ठिकाणी वाहनचोरी केल्याचे समोर आले आहे. सध्या मुख्य आरोपीचा साथीदार हजरत खान (कुर्ला, मुंबई) फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.