शाळा प्रवेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; ४३ वरिष्ठ अधिकारी थेट शाळांमध्ये जाणार

शाळा प्रवेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; ४३ वरिष्ठ अधिकारी थेट शाळांमध्ये जाणार

नवागत विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत; शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि प्रवेशवाढीवर विशेष भर

तभा वृत्तसेवा,

सोलापूर, दि. १२ जून

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात व्हावी आणि प्रत्येक बालक शाळेच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले आहे. ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ अंतर्गत जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना भेट देण्यासाठी तब्बल ४३ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, हे अधिकारी १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश केवळ नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणे एवढाच मर्यादित नसून शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अध्यापन प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेणे हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या शाळांची जबाबदारी दिली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, समाजकल्याण, उद्योग, जलसंधारण, पाणीपुरवठा, क्रीडा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शासनाच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाज आणि पालकांचा शिक्षणावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी राबविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, त्यांच्या अध्ययन क्षमतेचा आढावा घेतील आणि शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करतील.

या भेटीदरम्यान शाळेतील पायाभूत सुविधांचीही तपासणी केली जाणार आहे. वर्गखोल्यांची स्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मूलभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधने तसेच शालेय परिसराची देखभाल याबाबत अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देखील दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील कणबस, तळहिप्परगा, होटगी, कोंडी, नान्नज, बोकडदरवाडी, शिवणी, कारंबा, डोणगाव, हळदुगे, नेवरे, तिर्थ, चिंचपूर, रामपूर, बाणेगाव, वडापूर, आहेरवाडी, पाथरी, वळसंग, तिहे, कासेगाव, तांदूळवाडी, लवंगी, एकरुख, उळे, मार्डी, हिरज, बेलाटी, होटगी स्टेशन, हगलूर, फताटेवाडी, नांदणी, बंकलगी, वडकबाळ, बोरामणी, सिंदखेड, अंत्रोळी, मार्कंडेय नगर, प्रतापनगर, तेलगाव आणि कवठे यांसारख्या शाळांमध्ये अधिकारी भेटी देणार आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना भेटीनंतरचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अहवालाच्या आधारे शाळांमधील गरजा, समस्या आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि पालकांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करणे या दृष्टीने शाळा प्रवेशोत्सव महत्त्वाचा मानला जातो. यंदा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी थेट शाळांमध्ये पोहोचणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवेशोत्सवासोबतच शैक्षणिक गुणवत्तेला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शाळा प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश

इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

पालकांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे.

शैक्षणिक गुणवत्ता आणि शालेय सुविधांचा आढावा घेणे.

प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढविणे 

यंदाच्या प्रवेशोत्सवात जिल्हा प्रशासनातील ४३ वरिष्ठ अधिकारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याने हा उपक्रम केवळ स्वागत समारंभ न राहता शाळांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेणारा उपक्रम ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *