बार्शीत भगवंत महोत्सवाला नवी उंची; २८ एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
मंदिर परिसर विकासाला गती, महोत्सवात ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने रंगवली हास्याची मैफल
सोलापूर व्हिजन
श्री भगवंत प्रकटोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प असल्याचे महोत्सवाचे मार्गदर्शक तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

येत्या २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बार्शीत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे श्री भगवंत मंदिर व तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राऊत म्हणाले, श्री भगवंत मंदिर व परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राजसत्ता, लोकसहभाग आणि देणगीदारांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच नगरपालिका इमारत जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत स्थलांतरित करून सध्याची इमारत मंदिर परिसर विस्तारासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भगवंत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ या गाजलेल्या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना अक्षरशः खळखळून हसवले. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला.
हा महोत्सव सर्व बार्शीकरांचा असून अनेकांनी यासाठी सहकार्य केल्याचे सांगत भविष्यात हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही राऊत यांनी दिली.
दरम्यान, पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम २८ एप्रिल रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाजप युवानेते ॲड. रणवीर राऊत, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. गुलाबराव पाटील, मंदार कुलकर्णी, नगरसेवक विजय राऊत, राजाभाऊ सुरवसे, अरुण बारबोले, रमेश पाटील, संतोष निंबाळकर, असिफ तांबोळी, डॉ. संजय अंधारे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी आदी उपस्थित होते.