आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिर; तीन दिवस मोफत उपचार व तपासण्यांची सुविधा
२४ ते २६ जुलैदरम्यान पंढरपूरच्या तीन रस्ता (सोलापूर–बार्शी रोड) येथे आरोग्य विभागाचा उपक्रम; लाखो वारकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर व्हिजन | पंढरपूर, दि. २५ :
आषाढी वारीसाठी आळंदीसह राज्याच्या विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे येत असतात. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदाही व्यापक स्वरूपाचे महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
२४ ते २६ जुलै या कालावधीत पंढरपूर येथील तीन रस्ता (सोलापूर–बार्शी रोड) परिसरात हे शिबिर सुरू असून, वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची तपासणी, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जात आहे.

वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. विठ्ठलाचे रूप मानल्या जाणाऱ्या वारकऱ्यांना निरोगी आरोग्य सेवा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. चालण्यामुळे होणारा थकवा, पायांचे विकार, रक्तदाब, मधुमेह, ताप, निर्जलीकरण तसेच इतर तातडीच्या आरोग्य समस्यांवर तत्काळ उपचाराची सुविधा येथे उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व वारकरी व भाविकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाने यात्रेदरम्यान स्वच्छता राखणे, पुरेसे पाणी पिणे, त्रास जाणवल्यास तातडीने वैद्यकीय पथकाशी संपर्क साधणे आणि उपलब्ध मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही वारकऱ्यांना केले आहे. लाखो भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले हे महाआरोग्य शिबिर वारीतील आरोग्य संरक्षणाचा महत्त्वपूर्ण आधार ठरत आहे.