अरे व्वा…अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.२६ जुलै

आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या मूलभूत सुविधांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी याची राज्य शासनाने दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान केला. सलग दुसऱ्या वर्षी पालखी मार्गावरील सुविधा यशस्वीपणे उभारल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावरील मुक्कामस्थळी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, सुलभ शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वागत कमानी उभारण्यात आल्या. कडक उन्हासह पावसाळी वातावरणातही वारकऱ्यांना या सुविधांचा मोठा लाभ झाला.

या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सलग दुसऱ्या वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांभाळली. गतवर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशस्वी कामगिरीमुळे यंदा पुणे, सातारा आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांतील सुविधा व्यवस्थापनाची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात आली होती. कोहिनकर यांनी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

विशेष म्हणजे, यापूर्वी वादग्रस्त ठरणारी शौचालय उभारणीची निविदा प्रक्रिया यंदा प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत कोणत्याही वादाविना पूर्ण करण्यात आली. पालखी मार्गावरील स्वच्छतागृहे, जर्मन हँगर, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, रस्ते आणि अन्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या कार्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही विशेष कौतुक करत त्याचे श्रेय कोहिनकर यांच्या प्रभावी नेतृत्वाला दिले.

सन्मान स्वीकारल्यानंतर संदीप कोहिनकर यांनी या यशाचे श्रेय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय यंत्रणांना दिले. सर्व विभागांच्या समन्वयातून आणि संघभावनेतूनच आषाढी वारीचे नियोजन यशस्वी झाले, असे त्यांनी नमूद केले.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची ही राज्यस्तरीय दखल ठरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *