‘ग्रामविकासाची वारी, पंढरीच्या दारी’; वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामविकास विभागाची सर्वसमावेशक यंत्रणा सज्ज

निवास, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आपत्कालीन मदत ते सुरक्षिततेपर्यंत २० हून अधिक सुविधा; ‘सेवेतून विठ्ठलभक्ती’चा शासनाचा उपक्रम
सोलापूर व्हिजन | पंढरपूर, दि. २५ जुलै
आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाने ‘ग्रामविकासाची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविला आहे. ‘मान माऊलींचा, सेवा वारकऱ्यांची’ या संकल्पनेतून वारकऱ्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी भव्य निवारा केंद्र, चरणसेवा, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे व स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, फिरते दवाखाने, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाईल चार्जिंग व्हॅन, विश्रांती कक्ष आणि फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणी शुद्धीकरण, नियमित स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि धूळ नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन वैद्यकीय सेवा, बोटीद्वारे बचाव पथके, दिशादर्शक फलक, स्वागत कमानी आणि माहिती केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर प्रकाशयोजना, स्वच्छ परिसर आणि सुसज्ज सुविधा केंद्रांमुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होत आहे.
ग्रामविकास विभागाने केवळ सुविधा पुरविण्यावर भर न देता ‘सेवा हीच विठ्ठलभक्ती’ या भावनेतून प्रशासनातील विविध विभागांमध्ये समन्वय साधला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शनासाठी आवश्यक वातावरण निर्माण झाले असून, वारी व्यवस्थापनाचा हा उपक्रम राज्यातील लोकाभिमुख प्रशासनाचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सेवा मिळत असून, पंढरीची वारी अधिक सुकर आणि संस्मरणीय करण्यासाठी ग्रामविकास विभागाची यंत्रणा चोवीस तास कार्यरत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.