१ लाख १४ हजार ४६६ दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ
फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क न घेता ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे राज्य मंडळाचे आदेश; राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना लाभ
सोलापूर व्हिजन | सोलापूर, दि.३० सप्टेंबर
राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याचे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना परीक्षा अर्जाच्या टप्प्यावर आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य मंडळाने परीक्षा शुल्क न आकारता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी २९ सप्टेंबर रोजी सर्व विभागीय मंडळांच्या सचिवांना याबाबत तातडीचे पत्र पाठविले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या निर्णयाची तातडीने माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून सध्या परीक्षा शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून दहावीचे ६७ हजार ५६८, तर बारावीचे ४६ हजार ८९८, असे एकूण १ लाख १४ हजार ४६६ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दहावीमध्ये ३६ हजार २३६ मुले व ३१ हजार ३३२ मुली, तर बारावीमध्ये २४ हजार ५२८ मुले व २२ हजार ३७० मुलींचा समावेश आहे.
तालुकानिहाय आकडेवारीत दहावीमध्ये पंढरपूरचे ७ हजार ९५२ विद्यार्थी सर्वाधिक आहेत. त्यानंतर माळशिरस ७ हजार ३५९, बार्शी ६ हजार ७५, माढा ५ हजार ५९७, सांगोला ५ हजार ७२८ आणि सोलापूर उत्तर ५ हजार १५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीमध्येही पंढरपूरमधून ६ हजार १५७ विद्यार्थी सर्वाधिक असून, माळशिरस ४ हजार ९८२, बार्शी ४ हजार ७९१, यूआरसी-१ मधून ५ हजार ५८६ आणि यूआरसी-२ मधून ४ हजार ९७९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षा शुल्क माफीच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य मंडळाकडून पुढील सविस्तर सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल न करता मंडळाच्या निर्देशानुसार आवेदनपत्रे भरून घेणे आवश्यक आहे.
राज्य मंडळाने विभागीय मंडळांना संबंधित विभागातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने आदेश कळविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा
दुष्काळाच्या आर्थिक परिणामांना सामोरे जाणाऱ्या कुटुंबांवरील दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्काचा तात्पुरता आर्थिक भार या निर्णयामुळे कमी होणार आहे. परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाणार नसल्याने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकरी जिल्हा परिषद सोलापूर
दहावी : ६७,५६८ विद्यार्थी
बारावी : ४६,८९८ विद्यार्थी
एकूण : १,१४,४६६ विद्यार्थी
मुले : ६०,७६४
मुली : ५३,७०२
दहावीतील सर्वाधिक विद्यार्थी : पंढरपूर – ७,९५२
बारावीतील सर्वाधिक विद्यार्थी : पंढरपूर – ६,१५७