प्राचार्य बी. पी. रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश; पदोन्नती, नियुक्तीसह चार आदेश तातडीने निर्गमित

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता
सोलापूर व्हिजन / सोलापूर, दि. ३१ जुलै
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने गुरुवारी विशेष पुढाकार घेतला. विविध प्रकरणांवर सुनावणी घेऊन एका दिवसात तब्बल ३७ प्रश्नांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये चार महत्त्वाच्या प्रकरणांचे ऑनलाइन आदेश तातडीने निर्गमित झाल्याने संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
शिक्षकांचे विविध प्रशासकीय प्रश्न सातत्याने शासन व प्रशासनापुढे मांडणारे शिक्षक नेते प्राचार्य बी. पी. रोंगे यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी तातडीने संबंधित प्रस्तावांची छाननी करून अल्पावधीतच आवश्यक आदेश जारी केले.
यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक नेते फरीद इमाम जमादार यांना सहशिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा आदेश देण्यात आला. तसेच टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेतील रिक्त पदावर अर्जुन खटके यांची सहशिक्षक म्हणून नियुक्ती मंजूर करण्यात आली. बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील माध्यमिक विद्यालयात मेघा साखरे यांना अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली. याशिवाय आणखी एका शिक्षकाच्या पदोन्नतीचा आदेशही निर्गमित करण्यात आला.
सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून अनेक प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
बैठकीला प्राचार्य बी. पी. रोंगे, विभागीय समन्वयक सुरेश गुंड, सुभाष भिमनवरू, महेश घोंगडे, प्रशांत शिंपी आदी उपस्थित होते. विविध तालुक्यांतील शिक्षकांचे पदोन्नती, नियुक्ती, मान्यता आणि सेवा विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधला.
ऑनलाइन प्रणालीद्वारे अल्पावधीत आदेश निर्गमित झाल्यामुळे प्रशासकीय कामकाजात गती आल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी अशा विशेष बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता
सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे प्राचार्य बी. पी. रोंगे यांनी आपली तत्परता गुरुवारी दाखवून दिली. प्राचार्य रोंगे यांच्या सादास प्रतिसाद देत तेवढेच तत्पर असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी एक तासात चार ऑनलाइन मान्यता देऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. विशेषतः आजारी असलेले जगताप यांनी तत्काळ ही प्रक्रिया पार पाडल्याने त्यांच्या कामाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.
प्रलंबित असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न निकाली
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न निकाली काढणे साठी माध्यमिक शिक्षण विभागात गर्दी असते. प्राचार्य रोंगे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक नेते फरीद इमाम जमादार यांना सहशिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा आदेश एक तासात पारित करून घेतला. तसेच टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेत अर्जुन खटके या सहशिक्षकास रिक्त जागेवर नियुक्ती देण्याचा आदेश देण्यात आला.