‘सानप यांनाच चिवटे समजून मतदान करा!’
उदय सामंत यांची शिक्षक मतदारांना साद; मंगेश चिवटे यांचे नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही
१० हजार ५०० शिक्षक मतदारांच्या बहिष्काराच्या भूमिकेनंतर राजकीय हालचालींना वेग; बापूसाहेब अडसूळ यांच्या भेटीतून समेटाचे संकेत
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२२ ऑक्टोबर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची राजकीय खेळी केली आहे. ‘मंगेश चिवटे यांचे नुकसान होऊ देणार नाही,’ अशी ग्वाही देतानाच, ‘सचिन सानप यांनाच मंगेश चिवटे समजून मतदान करा,’ असे आवाहन सामंत यांनी शिक्षक मतदारांना केले. त्यामुळे नाराज शिक्षक मतदारांची मनधरणी करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे संस्थापक बापूसाहेब अडसूळ यांच्या कार्यालयाला उदय सामंत यांनी भेट दिली. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी करत अडसूळ यांनी आपल्या संघटनेतील १० हजार ५०० शिक्षक मतदारांसह मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे या संघटनेची नाराजी निवडणुकीत महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती.
याच पार्श्वभूमीवर अडसूळ आणि सामंत यांच्यात झालेल्या चर्चेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. चर्चेदरम्यान सामंत यांनी मंगेश चिवटे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आपण घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर शिक्षक मतदारांनी सचिन सानप यांनाच मंगेश चिवटे समजून मतदान करावे, असे आवाहन करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
### १० हजार ५०० मतदारांची भूमिका निर्णायक?
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत संघटनात्मक ताकद आणि मतांचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या १० हजार ५०० मतदारांची भूमिका निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकते. बहिष्काराच्या भूमिकेवरून मतदानाकडे वळवण्यात सामंत यांना कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सामंत यांच्या आवाहनामुळे संघटनेच्या भूमिकेत बदल होणार का, अडसूळ आपल्या शिक्षक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणार का आणि त्याचा सचिन सानप यांच्या मताधिक्यावर किती परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे ही भेट केवळ सदिच्छा भेट न राहता, नाराजी दूर करून मतांचे समीकरण जुळवण्याचा राजकीय प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे.