एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा पहिला दीक्षांत समारंभ रविवारी
डॉ. रघुनाथ माशेलकर, डी. राम रेड्डी यांची उपस्थिती; ९० विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
सोलापूर व्हिजन | सोलापूर दि.२३ ऑक्टोबर
उच्च शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्यांच्या क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभाचे आयोजन रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता केगाव येथील विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आले आहे. या समारंभात बीसीए, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांतील एकूण ९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असून, गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बालाजी अमाइन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे आणि कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.
या दीक्षांत समारंभात २०२३-२०२६ या कालावधीतील बीसीए, तसेच २०२३-२०२५ आणि २०२४-२०२६ या कालावधीतील एमबीए व एमसीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
उद्योगाभिमुख शिक्षणावर भर
माईर्स एमआयटी समूहाचे पाचवे विद्यापीठ म्हणून २०२३ मध्ये सोलापुरात स्थापन झालेल्या एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा भर प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगक्षेत्राशी समन्वय साधण्यावर आहे. विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगारविश्वातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची शैक्षणिक वाटचाल महत्त्वाची मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा पहिला दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.