बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर व्हिजन 

सोलापूर, दि. १ जुलै 

करमाळा तालुक्यातील गट क्रमांक ३९४ संदर्भातील कथित बनावट सातबारा उतारा व खरेदीखत प्रकरणात तत्कालीन तलाठी मुकुंद रामचंद्र राजूपाध्याय यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मेहरोझ पठाण यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा दिलासा दिला.

या प्रकरणात करमाळा येथील गट क्रमांक ३९४ ची जमीन खरेदी दस्त क्रमांक २४१०/२००७ अन्वये नोंदविण्यात आली होती. या व्यवहारात संबंधित दस्तावेज आणि सातबारा उताऱ्यामध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सातबारा उताऱ्यावर नावे असलेले रमेश गायकवाड, वत्सलाबाई सोनवणे आणि चंद्रलीला साळवे हे जिवंत असतानाही त्यांना १० ते १५ वर्षांपूर्वी मृत दाखवून बनावट सातबारा तयार करण्यात आला. त्याआधारे खोटे खरेदीखत तयार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सहाय्यक निबंधक अरविंद सूर्यकांत कोकाटे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन तलाठी मुकुंद राजूपाध्याय यांनी प्रथम बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला.

त्यानंतर आरोपीने ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने अर्जदाराचा कथित सहभाग मर्यादित स्वरूपाचा असून तपासासाठी कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड. रितेश थोबडे व ॲड. निखिल पाटील यांनी काम पाहिले, तर सरकारच्या वतीने ॲड. आश्विनी टकळकर यांनी बाजू मांडली.

दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सुरू असून तपास यंत्रणेकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *